Ad will apear here
Next
...आणि मिसेस बालगंधर्व!
‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातला ‘आणि या मिसेस बालगंधर्व’ हा डायलॉग ऐकून आणि पाहून आपण अनेकदा खळखळून हसला असाल. तोच या चित्रपटाचा ‘टर्निंग पॉइंट’ आहे. या चित्रपटात दाखवलेला हा बालगंधर्व रंगमंदिरातला प्रसंग पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेल्या आणि खऱ्या घडलेल्या किश्श्यावर आधारलेला आहे! या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीच ही आठवण सांगितली आहे. ‘गंधर्वनगरीच्या पन्नाशी’निमित्तानं सचिन यांनी सांगितलेली ही पडद्यामागची गोष्ट...
................
बालगंधर्व रंगमंदिराशी माझा पहिला संबंध आला, तो १९७२ साली ‘शिकार’ या नाटकात मी काम करत असताना. पुण्यातलं प्रशस्त, आलिशान आणि ग्लॅमरस असं नाट्यगृह, अशी तेव्हा या रंगमंदिराची ख्याती होती. पुण्यात तेव्हा रहदारी फारशी नव्हती आणि या नाट्यगृहाचा परिसरही भरपूर होता. त्यामुळे तिथे खेळायला, बागडायलाही मिळायचं. त्या काळातल्या इतर नाट्यगृहांच्या तुलनेत इथे भरपूर सोयीसुविधा होत्या. त्यामुळे नाटकाचे प्रयोग करताना हुरूप यायचा आणि प्रयोग रंगायचा. मी तेव्हा जेमतेम चौदा वर्षांचा असेन. त्यामुळे कलाकार म्हणून माझ्यासाठी या गोष्टी उत्साह वाढवणाऱ्या होत्या. त्या वेळी नाट्यगृहाच्याच आवारातल्या वसतिगृहात प्रयोगाच्या वेळी मी राहतही असे.

‘शिकार’नंतर मी नाटक करू शकलो नाही, त्यामुळे या नाट्यगृहाशी नियमित संबंध आला नाही. परंतु १९८५नंतर मी म्युझिकल शोज सुरू केल्यानंतर पुन्हा या ठिकाणच्या भेटी वाढल्या. या नाट्यगृहातले माझे शोजसुद्धा चांगलेच रंगले.

त्यानंतर पुन्हा ‘बालगंधर्व’शी संबंध आला, तो तेवढ्याच महत्त्वाच्या आणि अविस्मरणीय अशा गोष्टीसाठी. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची कथा माझ्या डोक्यात आली होती आणि ती मी व्ही. शांतारामबापूंना ऐकवली, तेव्हा चित्रपटातला टर्निंग पॉइंट असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा प्रसंग मी त्यांना आवर्जून ऐकवला होता. घराची गरज म्हणून दोन पुरुष बाईचं रूप घेताना दाखवायचं असलं, तरी या कलाकृतीला बालगंधर्वांच्या वेषांतरासारखा उच्च दर्जा असावा, असा माझा आग्रह होता. या चित्रपटात अशोक सराफ बालगंधर्व रंगमंदिरात जातो आणि तिथे बालगंधर्व आणि त्यांचं स्त्रीरूप यांची शेजारी शेजारी असलेली चित्रं बघून त्याला आपल्या मित्रांना बाई बनविण्याची कल्पना सुचते, असा तो प्रसंग होता. वसंतराव सबनीसांशी पटकथा लिहिण्याच्या आधी चर्चा झाली, तेव्हाही लक्ष्याचं डोहाळजेवण आणि हा बालगंधर्व रंगमंदिरातला प्रसंग, या दोन दृश्यांच्या बाबतीत मी माझा आग्रह स्पष्ट केला होता. त्यांनीही त्याला अनुसरूनच पटकथा लिहिली.

छायाचित्र : बालगंधर्व रंगमंदिराच्या वेबसाइटवरून साभार.पु. ल. देशपांडेंचा माझ्यावर जीव होता. मी त्यांना अनेकदा भेटायचो आणि ते गप्पांमध्ये अनेक किस्से ऐकवायचे. एकदा त्यांनीच किस्सा सांगितला, की ते त्यांच्या काही पाहुण्यांना नव्यानेच बांधलेलं बालगंधर्व रंगमंदिर दाखवायला घेऊन गेले होते. तिथल्या कर्मचाऱ्याला ‘पुलं’ कोण हे माहीत नव्हतं आणि बालगंधर्व कोण, हे तर माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानं ‘पुलं’ना आणि पाहुण्यांना उत्साहाने नाट्यगृह आतून दाखवलं आणि ते सगळे बालगंधर्वांच्या चित्रांपाशी आले. ‘पुलं’ना डावीकडचा मूळ वेशातला बालगंधर्वांचा फोटो दाखवून तो म्हणाला, ‘हे बालगंधर्व.’ मग शेजारच्या बाईच्या वेशातल्या बालगंधर्वांकडे बघून म्हणाला, ‘आणि या मिसेस बालगंधर्व.’

‘पुलं’चा हा किस्सा माझ्या डोक्यात होता. ‘बनवाबनवी’मध्ये मी तो सुशांत रे याच्या तोंडी माझ्या पद्धतीने वापरला. आपल्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या गोष्टी नंतर चांगल्या प्रकारे उपयोगी येतात, त्या अशा. बालगंधर्व रंगमंदिर माझ्यासाठी अशा तऱ्हेनं या चित्रपटासाठी मोलाचं ठरलं. हा चित्रपट प्रदर्शित झाला, ते वर्षं बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीचं होतं, हा आणखी एक अनोखा योगायोग. ‘अशी ही बनवाबनवी’ला जो दर्जा मिळाला, तो बालगंधर्व रंगमंदिर आणि तिथे असलेल्या बालगंधर्वांच्या त्या दोन चित्रांमुळेच, असं मला वाटतं.

(शब्दांकन : अभिजित पेंढारकर)

(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYXRBD
Similar Posts
‘मर्मबंधातली ठेव’ पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिले दोन-तीन दिवस नाट्यमहोत्सव झाला होता. ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भालबा केळकर यांचे ‘तू वेडा कुंभार’ हे नाटक त्यात सादर झाले होते. आताचे ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते सतीश आळेकर यांनी त्या नाटकात काम केले होते. अशा रीतीने उद्घाटन सोहळ्याशी थेट जोडले
गंधर्वनगरीची पन्नाशी बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज जन्मदिन. तसंच, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला आज, २६ जून २०१७ रोजी सुरुवात होत आहे. हे रंगमंदिर म्हणजे पुण्यातल्या सांस्कृतिक पटावरचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ‘बालगंधर्व’च्या पाच दशकांचा हा कालखंड म्हणजे साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटना-घडामोडींचा सुवर्णकाळच होय
कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. यंदा हे रंगमंदिर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं
‘प्रेक्षकांच्या प्रेमाची सुरुवात ‘बालगंधर्व’पासूनच....’ ‘मला आणि काशिनाथला जे प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं, त्याची सुरुवात पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामधूनच झाली!....’ सांगताहेत मराठी नाटक-सिनेमातला एक काळ गाजवलेले, उत्कृष्ट अभिनयासाठी वाखाणले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि पुण्यातले बुजुर्ग कलाकार श्रीकांत मोघे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language